स्वच्छता दूतांचा जीव धोक्यात
। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल महानगरपालिकेच्या कचरा घंटागाड्या अनेकदा क्षमतेपेक्षा अधिक कचरा भरून शहरातील विविध भागांतून वाहतूक करताना दिसत आहेत. गाड्यांमध्ये ओव्हरलोड कचरा असल्याने स्वच्छता दूतांना बसण्यासाठी जागा राहत नाही आणि काहीवेळा त्यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर किंवा गाडीच्या टपावर बसून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तसेच ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित करण्याच्या नियमांचेही अनेक ठिकाणी योग्य प्रकारे पालन होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पालिका प्रशासनाने कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढवून ओव्हरलोडिंग थांबवावे, तसेच ओला-सुका कचरा वर्गीकरणाबाबत अधिक प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागरिक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून होत आहे.







