रोहा तालुक्यात ग्रुपनिहाय बैठकींना समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
| चणेरा | प्रतिनिधी |
कुणबी समाजाची अचूक लोकसंख्या, शैक्षणिक प्रगती, सामाजिक स्थिती आणि आर्थिक परिस्थितीची माहिती संकलित करण्यासाठी कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा रोहा यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या जनगणना मोहिमेला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर रोहा तालुक्यातील मेंढा, नागोठणे, खांब आणि कोलाड या चार ग्रुपमध्ये आयोजित बैठकींना समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या बैठकींना कुणबी समाजोन्नती संघ, मुंबईचे उपाध्यक्ष शंकरराव म्हसकर, ओबीसी रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश मगर, कुणबी समाज रायगड जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष शिवराम महाबळे, रोहा तालुका अध्यक्ष रामचंद्र सकपाळ, रोहा पंचायत समितीचे उपसभापती संजय माडळुकर, तालुका उपाध्यक्ष अनंता थिटे, तालुका खजिनदार सुहास खरीवले, उद्योजक प्रमोद म्हसकर तसेच युवक समितीचे सदस्य मंगेश सानप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
बैठकीदरम्यान जनगणनेसाठी वितरित करण्यात आलेले फॉर्म अचूक माहिती भरून तातडीने तालुका शाखेकडे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. या जनगणनेमुळे समाजाची खरी लोकसंख्या, शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती तसेच सामाजिक परिस्थितीचे वास्तव चित्र समोर येणार असून, भविष्यात समाजहिताच्या विकासात्मक योजना राबविताना या माहितीचा महत्त्वपूर्ण उपयोग होणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी शंकरराव म्हसकर, सुरेश मगर आणि रामचंद्र सकपाळ यांनी जनगणनेचे महत्त्व विशद करत समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अचूक माहिती संकलन आवश्यक असल्याचे सांगितले. शासनाकडे समाजाचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठीही ही जनगणना महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
बैठकीस निवास खरीवले, रघुनाथ करंजे, दिलीप आवाज, हिराजी शिंदे, मारुती खांडेकर, रामचंद्र चितळकर, संजय कदम यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते. जनगणना मोहीम यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते गावोगावी जाऊन जनजागृती करत असून, समाजबांधवांनी सक्रिय सहभाग नोंदवून अचूक माहिती उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. समाजाच्या भविष्यातील विकासाचा भक्कम पाया ठरणाऱ्या या उपक्रमाला रोहा तालुक्यात सर्व स्तरांतून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.







