| पाली | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी जि.प. सदस्य शर्मिला बोडके व चंद्रकांत वारगुडे यांनी सिद्धेश्वर, आतोणे व नाडसुर या गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला शुक्रवारी (दि.19) भेट दिली. त्याचबरोर येथील आरोग्य सुविधांची देखील सविस्तर पाहणी केली.
पावसाळ्याच्या काळात साथीचे आजार, ताप, सर्दी, डेंग्यू, मलेरिया इत्यादीं आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन आरोग्य उपकेंद्रात आवश्यक औषधसाठा, वैद्यकीय साहित्य, तसेच विविध उपचार सुविधांची उपलब्धता तपासण्यात आली. आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून रुग्णसेवेदरम्यान येणाऱ्या अडचणी, विविध प्रलंबित प्रश्नांची माहिती घेण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवेसाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. औषधसाठा, स्वच्छता, रुग्णांच्या उपचाराची गुणवत्ता आणि आपत्कालीन सेवांची उपलब्धता याबाबत विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले.







