| आगरदांडा | प्रतिनिधी |
श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय, यशवंतनगर-नांदगाव येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी शिक्षक प्रतिनिधी म्हणून राहील फिरोज घलटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. माजी शिक्षक प्रतिनिधी भारत चव्हाण यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर ही निवड प्रक्रिया पार पडली.
राहील घलटे हे विद्यालयात हिंदी विषयाचे अनुभवी शिक्षक असून गेल्या 11 वर्षांपासून इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना हिंदी विषयाचे अध्यापन करत आहेत. तसेच ते दहावी सेमी इंग्रजी विभागाचे वर्गशिक्षक म्हणूनही कार्यरत आहेत. गेल्या दहा वर्षांपासून ते हिंदी विषय समितीचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत असून, मागील सात वर्षांपासून राष्ट्रभाषा हिंदी परीक्षा प्रमुख म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.
राष्ट्रभाषा हिंदी परीक्षेचे यशस्वी आयोजन, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले उपक्रम आणि शाळेचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान विशेष उल्लेखनीय मानले जाते. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून शाळेच्या व्यवस्थापनाने त्यांची शिक्षक प्रतिनिधीपदी निवड केली. याचवेळी शिक्षकेतर प्रतिनिधी म्हणून संतोष बुल्लू तर शिक्षक-पालक संघाच्या सचिवपदी अमर दरने यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा मुख्याध्यापिका अर्चना खोत आणि पर्यवेक्षक प्रतीक पेडणेकर यांनी गुलाबपुष्प देऊन सत्कार केला व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकवर्गाकडूनही सर्व नवनिर्वाचितांचे अभिनंदन करण्यात आले.







