| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नेरळ विकास प्राधिकरण मधील ममदापूर गावाकडे जाणारा रस्ता पहिल्याच पावसात पाण्यात बुडाला आहे. या ठिकाणी असलेल्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या बांधकाम व्यावसायिकांनी तेथे मातीचा भराव करून ठेवल्याने नैसर्गिक पाणी जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे ममदापूर गावातील रहिवाशांना पाहिल्याचा पावसात गुडघाभर पाण्यातून वाट काढत जावे लागले आहे.
नगररचना विभाग आणि जिल्हा परिषद यांनी नेरळ ग्रामपंचायत, ममदापूर ग्रामपंचायत आणि कोल्हारे ग्रामपंचायत मधील भविष्यातील नियोजन करण्यासाठी 2007 मध्ये नेरळ संकुल विकास प्राधिकरण यांची स्थापना करण्यात आली. मात्र, तरीदेखील ममदापूर ग्रामपंचायतमध्ये बिल्डर लॉबी कोणालाही जुमानत नाही. त्यामुळे मागील वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला आठ दिवस गावाकडे जाणारा रस्ता बंद होता. यावर्षी सुद्धा पावसाळ्यापूर्वीच एका बिल्डरने त्याच ठिकाणी नेरळ-ममदापूर मुख्य रस्त्यास लागून मातीची भरणी करून नैसर्गिक नाला बंद करण्याचा प्रताप केला आहे. या विकृत मानसिकतेमुळे ममदापूर भडवळ परिसरातील नागरिकांनी गेल्या वर्षी खूप त्रास सहन केला आहे.त्यामुळे या वर्षी पुन्हा परिस्थिती जैसे थे अशीच असून ग्रामस्थांना गुडघाभर पाण्यातून जावे लागत आहे. सोमवारी (दि.22) ममदापूर परिसरात केवळ 30 मिनिटे पाऊस झाला आणि त्यानंतर देखील ममदापूर गावाकडे जाणारा रस्ता पाण्याने भरून गेला.







