| उरण | प्रतिनिधी |
पहिल्याच पावसात चाणजे ग्रामपंचायतीच्या पावसाळापूर्व तयारी आणि नालेसफाईच्या दाव्यांची पोलखोल झाली आहे. मुसळधार पावसानंतर गावातील अनेक भागांमध्ये नाल्याचे पाणी थेट घरात शिरल्याने त्यांच्या संसाराची मोठी दाणादाण उडाली आहे. घरातील फर्निचर, अन्नधान्य, विद्युत उपकरणे व अन्य साहित्याचे नुकसान झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरवर्षी नालेसफाईसाठी निधी खर्च झाल्याचे दाखविले जाते. परंतु, प्रत्यक्षात मात्र नाल्यांची योग्य प्रकारे साफसफाई न झाल्याने पावसाचे पाणी तुंबून ते घरांमध्ये घुसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजावर आणि निधीच्या वापरावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, चाणजे ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा महाराष्ट्रातील उत्कृष्ट सरपंच पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. मात्र, गावातील सद्यस्थिती पाहता हा पुरस्कार कोणत्या निकषांवर देण्यात आला, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. ग्रामस्थांच्या मते, गेल्या अनेक वर्षांत विविध विकास योजनांअंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त झाला असला तरी त्याचा अपेक्षित लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचलेला नाही.







