| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन येथील माळी समाज हॉलमध्ये तालुकास्तरीय कृषी मेळावा आणि मार्गदर्शन शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. पंचायत समिती श्रीवर्धन आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षपद महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आ. आदिती तटकरे यांनी भूषविले होते. याप्रसंगी मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या विशेष कृषी पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
या मेळाव्यात उपस्थित राहिलेल्या विविध कृषी तज्ज्ञांनी शेतीपूरक व्यवसाय, पिकांचे उत्तम नियोजन, खतांचे व्यवस्थापन आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. आधुनिक शेती पद्धती आणि शासकीय योजनांचा लाभ घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली प्रगती साधावी, असे आवाहन यावेळी मंत्री महोदयांनी केले. या कार्यक्रमाला अलिबाग कृषी सभापती वैकुंठ पाटील आणि श्रीवर्धन पंचायत समितीचे सभापती सचिन किर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच, तहसीलदार महेंद्र वाकलेकर, वासंती गुणाजी, उपसभापती पूजा शिंदे, मंदार तोडणकर, मोहमद मेमन यांच्यासह विविध विभागांचे शासकीय अधिकारी व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. या मार्गदर्शन शिबिरासाठी श्रीवर्धन तालुक्यातील शेतकरी बांधवांनी अतिशय मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी व पंचायत समितीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.






