सत्त्ताधाऱ्यांचा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न आंदोलनकर्त्या नेत्यांचा आरोप
। पनवेल । प्रतिनिधी ।
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि प्रकल्पग्रस्तांच्या वतीने बुधवारी (दि.8) पनवेलहून मुंबईतील विधिमंडळावर काढण्यात येणारा पायी मोर्चा पोलिसांनी पनवेलमध्येच रोखला. आंदोलनासाठी परवानगी नाकारण्यात आल्यानंतर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची, घोषणाबाजी आणि किरकोळ झटापट झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मोर्चाची सुरुवात पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरून होणार होती. तेथून विधिमंडळावर पायी मोर्चा नेण्याची तयारी आंदोलनकर्त्यांनी केली होती. मात्र, आंदोलन सुरू होताच पनवेल शहर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत मोर्चेकऱ्यांना पुढे जाण्यापासून रोखले. काही आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना हटवत ताब्यात घेतले.
या आंदोलनाचे नेतृत्व रश्मिता पोपेटा यांनी केले. यावेळी खासदार सुरेश म्हात्रे, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते बबनदादा पाटील, मा.आ.मनोहर भोईर, जिल्हाप्रमुख दिपक निकम, सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, महानगरप्रमुख ॲड. समाधान काशिद, उरणच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर, मा.जिल्हाप्रमुख शिरिष घरत, काँग्रेस जिल्हाध्यक्षा श्रुती म्हात्रे, हेमराज म्हात्रे, शहरप्रमुख प्रवीण जाधव, सदानंद शिर्के, यतीन देशमुख, यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सरकार दि. बा. पाटील यांच्या नावाच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
या आंदोलनाला महायुतीतील भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचा पाठिंबा नव्हता. त्यामुळे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच ते दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही आंदोलनाच्या नेत्यांनी केला.
गेल्या दोन आठवड्यांपासून पनवेल आणि उरण परिसरातील प्रकल्पग्रस्त गावांमध्ये बैठका घेऊन या मोर्चाची तयारी सुरू होती. यापूर्वी सामाजिक कार्यकर्त्या रश्मिता पोपटा यांच्या उपोषणानंतर दि. बा. पाटील नामकरणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला होता. त्यानंतर विधिमंडळावर पायी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी मोर्चा सुरू होण्यापूर्वीच कारवाई केल्याने प्रकल्पग्रस्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पोलिसांच्या कारवाईवर टीका करत, “रायगडमध्ये यापूर्वीही अनेक आंदोलने झाली आहेत. सर्व आंदोलनांना परवानगी मिळतेच असे नाही; मात्र यावेळी पोलिसांनी घेतलेली भूमिका दडपशाहीची असून ती लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचवणारी आहे. दि. बा. पाटील यांच्या नावासाठीचा लढा यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहील,“ असे सांगितले. तर शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांनी सुद्धा शासनाचा व केंद्र शासनाचा निषेध केला. या आंदोलनात शिवसेना पूर्ण ताकदीनिशी उतरली असून कोणत्याही परिस्थितीत पोलिसांची दडपशाही सहन केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पनवेल शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या. दरम्यान या मोर्चा दरम्यानच मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या रश्मिता पोपेटा यांची प्रकृती खालावल्याने त्यांनी तातडीने एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेवून रोडपाली येथील मुख्यालयात एकत्रित जमा केल्याची माहिती मिळत आहे.









