| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिका हद्दीतील स्मशानभूमी आणि दफनभूमींवर तातडीने सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक श्रम कामगार युनियनने महापालिका प्रशासनाला अंतिम स्मरणपत्र दिले आहे. यासंदर्भात युनियनने यापूर्वीही दोन वेळा निवेदने सादर केली होती. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. युनियनच्या निवेदनानुसार, पनवेल महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील एकूण 78 स्मशानभूमी व दफनभूमींवर सुरक्षा रक्षक नसल्याने सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण, धार्मिक स्थळांची सुरक्षितता तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. या ठिकाणी समाजविघातक कृत्ये होण्याची शक्यता असून, नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाण्याचा धोका असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी सादर करण्यात आलेल्या निवेदनांमध्येही हा मुद्दा मांडण्यात आला होता. तसेच, स्थानिक वृत्तपत्रांमधूनही या विषयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. तरीदेखील महापालिकेकडून कोणतीही कार्यवाही अथवा लेखी उत्तर देण्यात आले नसल्याचा आरोप युनियनने केला आहे. या प्रकरणी सक्षम शासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी तसेच संबंधित वैधानिक प्राधिकरणांकडे तक्रार दाखल करून पुढील कायदेशीर आणि प्रशासकीय पावले उचलण्याचा इशाराही देण्यात आला आहे.







