| खांदेश्वर | प्रतिनिधी |
पनवेल शहरातील गजबजलेल्या लाइन आळी परिसरात रस्त्यावरून सतत दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावर साचणारे आणि वाहणारे सांडपाणी यामुळे परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले असून, ये-जा करणाऱ्या नागरिकांसह वाहनचालकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे हा प्रकार वारंवार घडत असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
लाइन आळी हा पनवेल शहरातील वर्दळीचा परिसर आहे. या भागात नागरिकांची सतत ये-जा सुरू असते. दुकाने, व्यावसायिक आस्थापना आणि निवासी इमारती असल्याने दिवसभर नागरिकांची वर्दळ असते. मात्र, रस्त्यावरून वाहणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरातून चालणेही कठीण झाले आहे. पादचाऱ्यांना सांडपाण्यातून वाट काढावी लागत असून, दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या ये-जा करताना हे पाणी उडून नागरिकांच्या अंगावर पडत आहे. सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक आणि दुकानदार त्रस्त झाले आहेत. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना या परिस्थितीचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होण्याची भीतीही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे परिसरात आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पनवेल महानगरपालिका प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.






