मुंबईत परिवहन मंत्रांच्या हस्ते मुख्य कार्यक्रम
| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 78 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंगळवारी, दि.14 जुलै रोजी राज्यभरातील सर्व विभागीय कार्यालये, आगारे आणि बसस्थानक परिसरात व्यापक वृक्षारोपण अभियान राबविण्यात येणार आहे.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हरित महाराष्ट्राच्या संकल्पाला बळकटी देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून, मुख्य वृक्षारोपण कार्यक्रम विद्याविहार येथील मुंबई विभागीय कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी 10 वाजता परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
एसटी महामंडळाने याबाबत सर्व विभागांना परिपत्रक जारी करून प्रत्येक बसस्थानक, आगार व विभागीय कार्यालयाच्या परिसरात शक्यतो कुंपण भिंतीला लागून उपलब्ध जागेत स्थानिक हवामानास अनुरूप, शक्यतो स्थानिक प्रजातीच्या व दीर्घकाळ टिकणाऱ्या वृक्षांची लागवड करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
वृक्षारोपणानंतर त्यांच्या नियमित संगोपनाची जबाबदारी निश्चित करून हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता पर्यावरण संरक्षणाचा सातत्यपूर्ण संकल्प म्हणून राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या अभियानात स्थानिक आमदार, महापौर, नगराध्यक्ष, सरपंच तसेच अन्य लोकप्रतिनिधींना सन्मानपूर्वक निमंत्रित करून त्यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे. याशिवाय स्थानिक प्रशासनातील अधिकारी, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, विद्यार्थी, एसटी कर्मचारी आणि नागरिकांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.







