शाळाबाह्य मुलांना शोधून प्रवेश देणार; 30 जुलैपर्यंत मोहीम राबवणार
| रायगड | प्रतिनिधी |
बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिकार या कायद्यांतर्गत जिल्ह्यातील 6 ते 14 वयोगटातील कोणताही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून दि.15 ते 30 जुलैदरम्यान शाळाबाह्य मुलांची विशेष शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी अंगणवाडीसेविका, प्राथमिक व माध्यमिक विभागाचे शिक्षक विविध ठिकाणी भेटी देऊन शाळाबाह्य मुले आढळल्यास त्यांना त्यांच्या वयानुसार इयत्तेमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.
बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिकार 2009च्या कायद्यांतर्गत 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकांस शिक्षणाचा अधिकार आहे. यासाठी राजिप शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. साधारणतः सप्टेंबर महिन्यानंतर राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांतून शेतमजूर, बांधकाम कामगार, कोळसा-वीटभट्टी कामगारांची कुटुंबे मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत होत असतात. त्यामुळे अनेक वेळा अशा कुटुंबातील मुलांचे शिक्षण अपूर्ण राहते. त्यामुळेच अशा मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व त्यांना शाळेच्या प्रवाहात दाखल करणेसाठी विशेष शोध मोहीम दि.15 ते 30 जुलैदरम्यान राबविण्यात येणार आहे. या कालावधीत स्थलांतरीत होऊन येणाऱ्या 3 ते 18 बयोगटातील प्रत्येक बालकास वयानुरूप समकक्ष वर्गात दाखल करण्यात येणार आहे. तसेच, स्थलांतरीत होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांस शिक्षण हमीपत्र देण्यात येणार आहे.
दरम्यान, या कालावधीत रेल्वेस्टेशन, बसस्थानके, गावाबाहेरची वस्ती, वीटभट्ट्या, शेतमजुर, बांधकाम कामगार, स्थलांतरीत कुटुंबे, झोपड्या, फुले व अन्य वस्तू विकणारी तसेच रस्त्यावर भिक मागणारी बालके, अस्थायी निवारा करणारी कुटुंबे इत्यादी ठिकाणी अंगणवाडीसेविका, शिक्षक भेट देऊन पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार आहेत. तसेच, अशा शाळाबाह्य मुलांची माहिती घेऊन त्यांना वयानुरूप समकक्ष वर्गात दाखल करण्यात येणार आहे. पालकांनीही या शोधमोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जिल्हाधिकारी किशन जावळे, शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहितुले यांनी केले आहे.
स्थलांतरीत विद्यार्थ्याला शिक्षण हमीपत्र
अनेकदा बांधकाम कामगार, वीटभट्टी कामगार वर्षातून 2 ते 3 वेळा विविध ठिकाणी स्थलांतर करतात. अशा वेळी त्यांच्या मुलांचे शिक्षण थांबू नये व त्यांना दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थ्याला शिक्षण हमीपत्र देण्यात येणार आहे.







