। मुंबई । वृत्तसंस्था ।
कोव्हॅक्सिन लसीचा डोस दीडशे रुपयांना देणे परवडणारे नाही, असे भारत बायोटेकने मंगळवारी जाहीर केल्यानंतर बुधवारी पुन्हा लसीकरण धोरणावरून नवा गोंधळ पुढे आला आहे. कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवडयांपर्यंत वाढविण्याची शिफारस आम्ही केलीच नव्हती, असा दावा मएनटीएजीआयफच्या तज्ञ गटातील दोन शास्त्रज्ञांनी केला आहे. तर हा निर्णय वैज्ञानिकदृष्टया योग्य आहे, असे या गटाच्या अध्यक्षांनी म्हटले आहे. या दावे-प्रतिदावे यामुळे संभ्रम कायम आहे.
देशात लसीकरण सुरू झाले तेव्हा कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींसाठी दोन डोसमधील अंतर 28 दिवसांचे ठेवण्यात आले. त्यानंतर कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर 6 ते 8 आठवडयांपर्यंत वाढविले. त्यानंतर 16 मे रोजी हे अंतर 12 ते 16 आठवडे करण्यात आले. आता महिन्यानंतर दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवडयांपर्यंत वाढविण्यावरून वाद पुढे आला आहे. 12 ते 16 आठवडयापर्यंत वाढविण्याची शिफारस केली नव्हती, असे नॅशनल टेक्निकल अॅडव्हटायजरी ग्रुप ऑफ इम्युनायझेशन (एनटीएजीआय) या तज्ञ गटातील सदस्य एम. डी. गुप्ते आणि मॅथ्यू वर्गेसी यांनी म्हटले आहे.