| पनवेल ग्रामीण | प्रतिनिधी |
पनवेल-जेएनपीटी मार्गावरील सुरू असलेल्या कामादरम्यान बुधवारी (दि.15) धावत्या इनोव्हा कारवर लोखंडी बॅरिकेडचा खांब कोसळल्याने मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. या घटनेत बदलापूर येथील अनिल धर्माधिकारी यांच्या इनोव्हा कारचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने वाहनातील सर्वजण सुखरूप बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल-जेएनपीटी मार्गावर उड्डाणपूल व रस्त्याच्या कामासाठी क्रेनच्या सहाय्याने लोखंडी बॅरिकेडचा भाग उचलण्यात येत होता. त्याचवेळी तोल गेल्याने लोखंडी खांब अचानक निसटून खाली आला आणि रस्त्यावरून जात असलेल्या इनोव्हा कारवर आदळला. धडकेमुळे कारच्या छतासह पुढील भागाचे नुकसान झाले. मात्र, काही क्षणांच्या फरकाने मोठी जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला हलवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेमुळे काही काळ पनवेल-जेएनपीटी मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती.
या अपघातानंतर सुरू असलेल्या कामांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. काम सुरू असताना पुरेशा सुरक्षाव्यवस्था, वाहतूक नियंत्रण आणि क्रेनद्वारे उचलण्यात येणाऱ्या साहित्याची योग्य काळजी घेतली जात आहे का, असा सवाल वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे. पनवेल-जेएनपीटी मार्गावर सुरू असलेल्या कामांदरम्यान यापूर्वीही अशा स्वरूपाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे कामे करताना सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करून वाहनचालक व नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.







