| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या कर्नाळा पक्षी अभयारण्यात पावसाळ्याची चाहूल देणारा रंगीबेरंगी ओडीके पक्षी (Black-backed Dwarf Kingfisher) पक्षी पुन्हा एकदा दाखल झाला असून, पक्षीप्रेमी आणि छायाचित्रकारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लालसर चोच, जांभळट डोके, निळसर पंख आणि केशरी रंगाच्या छटांनी नटलेला हा लहान आकाराचा पक्षी आपल्या आकर्षक सौंदर्यामुळे सहज लक्ष वेधून घेतो. पावसाळा सुरू होताच हा पक्षी कर्नाळा परिसरातील दाट जंगलात घरटी बांधण्यासाठी आणि प्रजननासाठी येत असल्याचे पक्षी अभ्यासक सांगतात. स्थानिकांमध्ये या पक्ष्याला “पावसाचा दूत“ म्हणूनही ओळखले जाते. ओडीकेचे दर्शन म्हणजे पावसाळ्याची चाहूल, अशी पारंपरिक समज अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. कर्नाळा अभयारण्यातील ओलसर वातावरण, दाट झाडी आणि नैसर्गिक अधिवास या पक्ष्याच्या वास्तव्यास पोषक ठरतात. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात देश-विदेशातील पक्षीनिरीक्षक आणि वन्यजीव छायाचित्रकार येथे मोठ्या संख्येने भेट देतात. पक्षी अभ्यासक माधव आठवले यांनी सांगितले की, “ओडीके हा अत्यंत लाजाळू आणि दुर्मिळ दिसणारा पक्षी आहे. त्याची उपस्थिती म्हणजे जंगलातील पर्यावरण संतुलित असल्याचे द्योतक आहे. त्याच्या अधिवासाचे संरक्षण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.”
वन विभागाने पर्यटकांना पक्षीनिरीक्षण करताना शांतता राखावी, घरट्यांजवळ गर्दी करू नये आणि जंगलातील नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
पावसाळ्यात कर्नाळा अभयारण्यात ओडक पक्ष्याच्या आगमनामुळे निसर्गप्रेमींना आणखी एक सुंदर पर्वणी लाभली असून, या रंगीबेरंगी पाहुण्यामुळे कर्नाळ्याच्या जैवविविधतेत पुन्हा एकदा भर पडली आहे.






