| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नेवाळी आदिवासीवाडीतून 15 आणि 16 वर्षीय दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, त्यांना फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. 17 जुलै रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास फिर्यादींची 16 वर्षांची मुलगी आणि पुतणीची 15 वर्षीय मुलगी घरातील कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्या. दोघीही अद्याप घरी परतल्या नसल्याने कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक मीनल शिंदे अधिक तपास करीत आहेत.







