सायबर सेलसह दहशतवादी विरोधी पथक ॲक्शन मोडवर
| रायगड | प्रमोद जाधव |
रायगड जिल्ह्यात गोपाळकाळानिमित्त होणारा दहीहंडी उत्सव तसेच आगामी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्याची तयारी जोमाने सुरु आहे. मात्र, हा उत्सव साजरा होत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रायगड पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. त्यासाठी वेगवेगळी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच, वाद घालणाऱ्यांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई सुरु केली आहे. यादरम्यान, रायगड पोलिसांसह सायबर सेल व दहशतवादी विरोधी पथकाद्वारेदेखील सणांवर नजर राहणार आहे.
दहीहंडीचा उत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. यावेळी जिल्ह्यांमध्ये 8 हजार 800 ठिकाणी दहीहंडी उभारल्या जाणार आहेत. त्यापैकी 340 ठिकाणी मिरवणुका काढल्या जाणार आहेत. दुपारपासून सुरु होणारा हा उत्सव रात्री दहा वाजेपर्यंत ठिकठिकाणी सुरु राहणार आहे. या दहीहंडी उत्सवाचा आनंद घेण्यासाठी लाखो नागरिकांची अलोट गर्दी होणार आहे. तसेच, दहीहंडीनंतर बाप्पाच्या स्वागताची लगबग होणार आहे. यंदा दि.14 सप्टेंबरला घरोघरी गणरायाचे आगमन होणार आहे. त्यामुळे गावोगावी दि.14 ते 25 सप्टेंबर या कालावधीत मोठ्या उत्सवाचे स्वरुप निर्माण होणार आहे. यावेळी जिल्ह्यामध्ये 1 लाख 5 हजार 54 गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. तसेच, गणेशोत्सव कालावधीत शहरी व ग्रामीण भागात धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक, सांस्कृतिक व समाज प्रबोधनाचे कार्यक्रमदेखील घेतले जाणार आहेत.
दरम्यान, हे सण साजरे होत असताना काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रायगड पोलिसांनी प्रत्येकाच्या संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे स्तरावर शांतता कमिटीच्या 36, मोहल्ला कमिटीच्या 30, गणेश मंडळासह गोविंदा मंडळाच्या 130, तसेच 125 अशा एकूण 321 ठिकाणी गावभेटी व बैठका घेण्यात आल्या आहेत. तसेच, जिल्ह्यातील 16 पोलीस ठाण्याच्या हद्दीत दंगा काबू व रुट मार्च काढून सण, उत्सव आनंदमय व शांततामय वातावरणात साजरे करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. त्याचबरोबर जातीय सलोखा राखण्यासाठीही आवाहन करण्यात आले आहे.
655 गावगुंडांना दणका
जिल्ह्यात सण व उत्सव साजरे होत असताना गावगुंडांकडून होणारे वाद टाळण्यासाठी रायगड पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. भारतीय नागरि सुरक्षा संहिता तसेच मुंबई पोलीस अधिनिअम, महाराष्ट्र प्रोव्हीजन अधिनिअम अंतर्गत 655 जणांना दणका देण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. तसेच, त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्याचे काम पोलिसांकडून सुरु केले आहे. सण-उत्सवामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी रायगड पोलिसांनी ही मोहीम हाती घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.







