बेकरेवाडीतील अंगणवाडीचे छप्पर उडाले
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या बेकरेवाडी या दुर्गम आदिवासी वाडीत मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले असून, येथील अंगणवाडीचे छप्पर उडून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
बेकरवाडी येथील मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या वादळी पावसामुळे अंगणवाडीवरील पत्रे उडून गेल्याने संपूर्ण इमारत उघडी पडली आहे. विशेष म्हणजे ही घटना रात्री घडल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, सकाळी अंगणवाडी सेविका कामासाठी आल्यावर तिला ही गंभीर परिस्थिती निदर्शनास आली. छप्पर नसल्याने रात्रभर पडलेल्या पावसाचे पाणी अंगणवाडीत साचले होते. वर्गात सर्वत्र चिखल आणि पाणी साचल्याने लहान मुलांना बसण्यासाठी योग्य जाग उरली नव्हती. या गंभीर परिस्थितीतही शिक्षण खंडित होऊ नये, यासाठी अंगणवाडी सेविकेने उल्लेखनीय पुढाकार घेतला. तिने अंगणवाडी आपल्या राहत्या घरी हलवून मुलांना शिक्षण देण्यास सुरुवात केली. दुर्गम भागातही शिक्षणाची ज्योत कायम ठेवण्याचा तिचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहे. दरम्यान, या घटनेमुळे आदिवासी भागातील अंगणवाड्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. पावसाळ्यात अशा घटना वारंवार घडत असल्याने लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामस्थांनी संबंधित प्रशासनाकडे तातडीने अंगणवाडीची दुरुस्ती करून सुरक्षित इमारत उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच अशा दुर्गम वाड्यांमध्ये मजबूत व पक्क्या अंगणवाड्या उभारण्याची आवश्यकता असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.






