विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका; पालकांमध्ये काळजीचे वातावरण
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यातील काळींजे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली असून, शालेय विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. शाळेच्या इमारतीच्या पिलरला मोठे तडे गेले असून, स्लॅबचा सिमेंट-काँक्रीटचा भाग ढासळू लागला आहे. अशा धोकादायक परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत असल्याने पालकांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काळींजे येथील या जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग आहेत. सध्या 38 विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यांना घडवण्यासाठी तीन शिक्षक कार्यरत आहेत. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे विद्यार्थ्यांवर अपघाताची टांगती तलवार धरली गेली आहे. ग्रामीण भागातील मराठी शाळा टिकवणे आणि समृद्ध करणे ही शासनाची जबाबदारी आहे. परंतु, या शाळांच्या दुरुस्तीकडे आणि सुरक्षेकडे होणारे दुर्लक्ष पाहता मराठी शाळांचा ऱ्हास करण्यास शासनच जबाबदार आहे का? असा प्रश्न आता पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
एकीकडे शासन मराठी शाळा वाचवण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती करते, तर दुसरीकडे प्रत्यक्ष ग्रामीण भागातील शाळांची अशी दुरवस्था झाली आहे. एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी शिक्षण विभागाने व प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन काळींजे शाळेच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
काळींजे शाळेची इमारत धोकादायक झाली आहे. पिलरला गेलेले तडे पाहता कोणतीही दुर्घटना घडू शकते. आम्ही यासंदर्भात पंचायत समिती आणि शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला आहे. शासनाने तातडीने या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून नवीन इमारतीसाठी निधी मंजूर करावा.
– उदय पाटील, माजी सरपंच, काळींजे







