। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल तालुक्यातील हरिग्राम येथे बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून बांधकाम कामगाराचा निष्पाप बळी गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना न करता कामगारांकडून धोकादायक स्थितीत काम करून घेतल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. पनवेल तालुका पोलिसांनी या दुर्घटनेला जबाबदार धरुन संबंधित बांधकाम विकासकाविरुध्द निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
पनवेल तालुक्यातील हरिग्राम येथील मोरने परिसरात शांती स्कायेरा या नावाने इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या बांधकाम साईटवर उत्तमकुमार कृष्णाराम यादव (39) सेंट्रिंगचे काम करत होता. उत्तमकुमार पाचव्या मजल्यावर सेंट्रिंगचे काम करत असताना त्याचा अचानक तोल गेला आणि तो खाली कोसळला. उत्तमकुमार याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
बांधकाम ठिकाणी उंचावर काम करताना कामगारांना आवश्यक असलेली सेफ्टी बेल्ट, हेल्मेट, सुरक्षा जाळी यासारखी कोणतीही जीवरक्षक साधने पुरवण्यात आली नव्हती. उमा इन्फ्राटेक कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालकाने सुरक्षेची कोणतीही उपाययोजना न करता निष्काळजीपणे कामगाराला उंचावर काम करण्यास भाग पाडले, ज्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात आढळून आले आहे. त्यामुळे पनवेल तालुका पोलिसांनी या दुर्घटनेला जबाबदार धरुन उमा इन्फ्राटेक कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालकीण धरमी ऋषभ चोपडा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश मोकाशी करीत आहेत.






