| पाली / गोमाशी | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील गोमाशी परिसरात गणेशोत्सव काळात वासुदेव दाखल झाले. डोक्यावर मोरपिसाची टोपी, अंगात पांढरा अंगरखा, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, कपाळावर गंध आणि हातात चिपळ्या व टाळ घेऊन सकाळीच गावात प्रवेश करत आहेत. या दोन वासुदेवांनी पारंपरिक वेशभूषेत भजन म्हणत उपस्थितांचे लक्ष वेधून घेत आहेत. पूर्वी गावोगावी दिसणारी वासुदेवाची परंपरा आता हळूहळू लोप पावत चालली आहे. मात्र, आजही काही कलाकार ही लोककला जपत आहेत. घरासमोर वासुदेव आल्यावर महिला त्यांचे औक्षण करून धान्य, पैसे देतात. वासुदेवही आशीर्वाद देत पुढे मार्गस्थ होतात.सध्या पावसाळ्यात ही वासुदेव दिसू लागल्यामुळे लहान मुलांमध्ये मोठी उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण आहे.






