लाकडांसह 39 हजारांचा मुद्देमाल जप्त
| नागोठणे | प्रतिनिधी |
खैर जातीच्या झाडाची तोड करून त्या झाडाच्या कापलेल्या तुकड्यांची कारमधून वाहतूक करण्याचा कोणताही वैध परवाना जवळ न बाळगता अवैधरित्या खैराची वाहतूक करणाऱ्या तीन चोरट्यांना वनखात्याच्या नागोठणे परिक्षेत्र कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून 4 हजार 236 रुपये किमतीचे खैर लाकूड, 30 हजार रुपये किमतीची कार तसेच 5 हजार रुपये किमतीचे पेट्रोल कटर मशीन असा एकूण 39 हजार 236 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या तीन खैर चोरट्यांमध्ये भाऊ चंदर मोरे (32), आकाश बाबाजी वाघमारे (23) व महेंद्र मनोहर वाघमारे (26, सर्व रा. चांदे आदिवासीवाडी, ता. माणगाव, जि. रायगड) यांचा समावेश असून, त्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
यासंदर्भात उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, नागोठणे वन परिक्षेत्र अधिकारी दादासाहेब कुकडे यांना यासंदर्भात गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार उपवनसंरक्षक उमेश वावरे व सहायक वनसंरक्षक भाऊसाहेब जावरे यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे वन परिक्षेत्र अधिकारी दादासाहेब कुकडे यांच्या सूचनेनुसार वन विभागाच्या नागोठणे पथकाने बुधवारी (दि.22) पहाटे पाली-वाकण रस्त्यावरील वजरोली येथे सापळा रचला. रस्त्यालगत हे पथक दबा धरून बसले असतानाच पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास वाकणकडून पालीच्या दिशेने येणारी मारुती अल्टो (एमएच-06 एएन-2083) कार थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये 0.345 घनमीटर क्षमतेचे 19 नग खैर लाकडाचे तुकडे आढळून आले. या गुन्ह्यात वापरलेली कार, खैर तुकडे व पेट्रोल कटर मशीन जप्त करण्यात आले आहे.
या कारवाईत वनरक्षक अर्जुन जारवाल, मधुकर सोनवणे, अमोल खांडेकर, रणजीत कारंडे, प्रवीण देवडे आणि व्यंकटी माने यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. याप्रकरणी नागोठणे वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल मनोज साळवी हे पुढील तपास करीत आहेत.






