| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
महावितरण कंपनीच्या वीज खांबांवर, रोहित्रांवर आणि स्टे वायरवर अनधिकृतपणे टाकण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या केबल्स पुढील सात दिवसांत स्वतःच्या खर्चाने काढून घ्याव्यात, अन्यथा संबंधित मालकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महावितरण कार्यालय, श्रीवर्धन यांच्या वतीने देण्यात आला आहे.
श्रीवर्धन परिसरात केबल टी.व्ही. ऑपरेटर, इंटरनेट सेवा प्रदाते, सी.सी.टी.व्ही. चालक व टेलिफोन कंपन्यांनी महावितरणच्या यंत्रणेचा वापर करून अनधिकृत केबल्सचे जाळे पसरवल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे वीज पुरवठ्याची देखभाल व दुरुस्ती करताना अडथळे येत असून आगीच्या घटना, विद्युत अपघात आणि मनुष्यहानीचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. दिलेल्या सात दिवसांच्या मुदतीत केबल्स न हटवल्यास महावितरण कोणतीही पूर्वसूचना न देता त्या काढून टाकेल. होणाऱ्या नुकसानीस आणि खर्चास संबंधित ऑपरेटर जबाबदार राहतील. तसेच सर्व संबंधितांनी विद्युत उपकरणांपासून सुरक्षित अंतर राखावे आणि नवीन केबल्स टाकू नयेत, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.






