| नेरळ | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील महसूल कर्मचारी असलेले पेण तालुक्यातील मंडळ अधिकारी रविकांत जाधव यांच्या अटकेविरोधात रायगड महसूल कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या आंदोलनात कर्जत तालुका महसूल कर्मचारी संघटना सहभागी होत आहे. याबाबत संघटनेने तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.
पेण तालुक्यात मंडळ अधिकारी रविकांत जाधव यांनी शासकीय कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून थेट अटक करण्यात आली. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार महसूल अधिकाऱ्यांनी केलेल्या शासकीय कामकाजाबाबत कारवाई करण्यासाठी ठरावीक कायदेशीर प्रक्रिया असून, तिचे पालन झाले नसल्याचा दावा संघटनेने केला आहे. याबाबत संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. रविकांत जाधव यांच्यावरील अटकेचा फेरविचार करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कार्यवाही करावी आणि भविष्यात महसूल अधिकाऱ्यांवर अशा प्रकारे थेट गुन्हे दाखल करून अटक करण्याच्या घटना टाळाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. या अटकेच्या विरोधात दि.26 जुलै रोजी महसूल कर्मचाऱ्यांकडून लेखणी बंद आंदोलन करण्यात येणार आहे. तर, मागण्यांची पूर्तता न झाल्यास दि.27 जुलैपासून रायगड जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करतील, असा इशाराही संघटनेने दिला आहे.





