| पनवेल | प्रतिनिधी |
कळंबोली, कामोठे आणि खांदा कॉलनी परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, बेकायदेशीर पार्किंग व विस्कळीत वाहतूक व्यवस्थेमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्याची दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपक निकम यांनी कळंबोली वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, कळंबोली, कामोठे व खांदा कॉलनी परिसरात वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. अंतर्गत रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी होणाऱ्या बेकायदेशीर पार्किंगमुळे रस्ते अरुंद होत असून, नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी येणाऱ्या वाहनांमुळे सकाळी आणि सुट्टीच्या वेळेत वाहतूक विस्कळीत होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी वाहतूक सिग्नल दीर्घकाळापासून बंद असून, वाहतूक पोलिसांची उपस्थिती अपुरी असल्याने समस्या अधिक गंभीर बनल्याचे निकम यांनी म्हटले आहे. त्याशिवाय कळंबोली स्टील मार्केट परिसर, रोडपाली सिग्नल ते कळंबोली सर्कलदरम्यान रस्त्याच्या कडेला अवजड ट्रक व ट्रेलर उभे राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढत असल्याचा मुद्दाही निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे. नागरिकांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाने या प्रश्नांची गंभीर दखल घेऊन तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा दीपक निकम यांनी व्यक्त केली आहे.







