| खांदेश्वर | प्रतिनिधी |
जेएनपीटी-पळस्पे महामार्गावरील साई वर्ल्ड सिटीच्या मागील बाजूस असलेल्या गाळ्यांना रविवारी (दि.28) रात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत एकूण चार गाळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. मात्र, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आणण्यात आली असून, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाला रात्री सात वाजण्याच्या सुमारास आगीची वर्दी मिळाली. अभिमन्यू लांडगे यांनी माहिती दिल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी रवाना करण्यात आले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर चार गाळ्यांना आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यामध्ये एसी कॉम्प्रेसर व गॅस रिफिलचे साहित्य, फरसाण व चिप्स निर्मिती कारखाना, फर्निचर तसेच सीलिंग पीव्हीसी शीटचा गाळा यांचा समावेश होता. यावेळी आग विझविण्यासाठी होज रील तसेच दोन होजची एक लाईन टाकून पाण्याचा मारा करण्यात आला. त्यानंतर गाळ्यांमधील साहित्य थंड करण्याचे काम सुरू करण्यात आले. आगीवर नियंत्रण मिळविताना गाळ्यांचे शेल्टर अडथळा ठरत असल्याने घटनास्थळी जेसीबी बोलावून शेल्टर तोडण्यात आले. तसेच, जळालेले व नुकसानग्रस्त साहित्य बाहेर काढून त्याचा साल्वेज जमा करण्याचे काम करण्यात आले. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून त्याबाबत तपास सुरू आहे.






