झाडांच्या फांद्या, विजेचे पोल कोसळले; जनजीवन विस्कळीत
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
पावसाने दडी मारल्याने उन्हाच्या चटक्यांनी हैराण झालेल्या रायगडकरांना मंगळवारी परतीच्या पावसाने दिलासा दिला. मात्र, खालापूर आणि पनवेल तालुक्याला पावसासोबत आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने चांगलाच तडाखा दिला. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या रस्त्यावर कोसळल्या, विजेचे पोल पडले आणि वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. काही मार्गांवर वाहतूक मंदावून कोंडीची परिस्थिती निर्माण झाली.
हवामान विभागाने मंगळवारी (दि.29) जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला होता. त्यानुसार खालापूर, पनवेल, महाड, रोहा आणि पेण तालुक्यांत विविध ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी लावली. मात्र, खालापूर आणि पनवेलमध्ये पावसाचा जोर अधिक राहिला. दुपारनंतर खालापूर तालुक्यात अचानक पावसाचा जोर वाढला. मुसळधार पावसासोबत सोसाट्याचा वारा सुटल्याने रस्त्यालगतच्या झाडांच्या मोठ्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या. त्यामुळे काही मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली.

वादळी वाऱ्याचा फटका वीज यंत्रणेलाही बसला. काही ठिकाणी वीजपोल कोसळल्याने तसेच वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाल्याने अनेक गावांतील वीजपुरवठा कित्येक तास खंडित राहिला. अचानक वीज गायब झाल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागले. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू होती. रस्त्यावर कोसळलेल्या फांद्या हटविण्यासाठी स्थानिक नागरिक आणि संबंधित यंत्रणांकडून प्रयत्न करण्यात आले. काही ठिकाणी वाहतूक मंदावल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला.
पनवेल तालुक्यातही काही ठिकाणी तुरळक, तर काही भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. महाड, रोहा आणि पेण तालुक्यांत तुलनेने तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले, तर शेतकऱ्यांनाही काहीसा दिलासा मिळाला.
दरम्यान, यंदा रायगड जिल्ह्यात पावसाचे आगमन उशिरा झाले. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्याने अनेक भागांत पावसाची प्रतीक्षा होती. अशातच मंगळवारी झालेल्या परतीच्या पावसाने नागरिकांना दिलासा दिला. मात्र, खालापूर-पनवेलमध्ये वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीने प्रशासनासमोरही आव्हान उभे केले.






