| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील वाढत्या गगनचुंबी इमारतींच्या छतांवर मोठ्या प्रमाणात पत्र्यांचे शेड उभारण्यात आले असून, पावसाळ्यातील वादळी वाऱ्यांमुळे हे पत्रे उडून मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नवी मुंबईप्रमाणेच उरणमध्येही अनेक उंच इमारती, व्यावसायिक संकुले तसेच बांधकामांवर सुरक्षा नियमांना हरताळ फासून पत्र्यांची उभारणी करण्यात आल्याचे चित्र आहे. मात्र, याकडे उरण नगरपालिका प्रशासन, नगररचना विभाग आणि अग्निशमन यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
दरवर्षी पावसाळ्यात जोरदार वाऱ्यामुळे जाहिरात फलक, लोखंडी पत्रे, बांधकामांवरील तात्पुरती संरचना आणि टिनशेड उडून अपघात घडत असतात. तरीदेखील उरणमध्ये अशा धोकादायक संरचनांची कोणतीही व्यापक तपासणी करण्यात आलेली नाही. अनेक इमारतींच्या छतांवर बसविण्यात आलेले मोठमोठे पत्रे वाऱ्याच्या झोताने उडून रस्त्यावर, शेजारच्या इमारतींवर किंवा वाहनांवर कोसळल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. विशेष म्हणजे, अशा पत्र्यांना परवानगी देताना सुरक्षा निकषांचे पालन झाले आहे का, संरचनात्मक स्थैर्याचा अहवाल घेण्यात आला आहे का, तसेच नियमित तपासणी केली जाते का, याबाबतही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित विभागांकडून कोणतीही प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.






