अलिबागमध्ये महाराजस्व समाधान शिबीर अभियान
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबागमध्ये महाराजस्व समाधान शिबीर अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात घेण्यात आला. मात्र, प्रशासनाकडून राज्य शिष्टाचाराचे पालन न केल्याची खंत खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. त्यांनी प्रशासनाच्या कारभाराबाबात तीव्र नाराजी व्यक्त केली. ही नाराजी कार्यक्रमात सुरुवातीपासूनच दिसून आली. मात्र, महसूल मंत्र्यांनी मध्यस्थीची भुमिका घेतल्यानंतर हे प्रकरण शांत झाले. रायगड जिल्ह्यातील सर्व स्तरातील घटकाला एकाच ठिकाणी योजनेचा लाभ मिळावा, यासाठी महाराजस्व अभियान राबविण्यात आले. शासकीय कार्यक्रम सुट्टीच्या दिवशी घेतला असतानादेखील रायगड जिल्ह्यासह वेगवेगळ्या जिल्ह्यातीलअधिकारी व कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सभागृह भरून गेले होते. त्यावेळी काही नागरिक या कार्यक्रमात योजनेचा लाभ मिळेल, या आशेने आले होते. मात्र, उशीर झाल्याने सन्मानाचा कार्यक्रम आटोपता घेण्यात आला. त्यामुळे काही लाभार्थी व सन्मानपात्र व्यक्ती रिकाम्या हातीच गेले. दरम्यान, खासदार सुनील तटकरे कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्यापासून नाराज असल्याचे सभागृहातील नागरिकांच्या निदर्शनास दिसून आले. जिल्हा प्रशासनाकडून राज्य शिष्टाचाराचे पालन केले नसल्याची खंत खासदार तटकरे यांनी व्यक्त केली. यावेळी महसूल मंत्री यांनी मध्यस्थीची भुमिका घेत आगामी काळात असे होणार नाही, असे सांगितले.
यावेळी तटकरे यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीतून नेहमीप्रमाणे उशीरा येणारे भाजपचे आमदार रविंद्र पाटील तसेच शिंदे गटातील आमदार दळवी यांना टोला मारला. यावेळी उपस्थितांनी याचा आनंद मनमुरादपणे लुटला. दरम्यान, गोगावले भाषण करण्यास उठले. त्यांनी भाषण करण्यास सुरुवात केली. परंतु, तटकरे आणि महसूल मंत्री एकमेकांशी बोलत राहिले. त्यावेळी गोगावले यांनी तटकरेंना आवाज देत “तुमचे आम्ही ऐकले, आता तुम्ही आमचे ऐका”, असा टोला मारल्याचा आनंद उपस्थितांनी घेतला. या शासकीय कार्यक्रमांत राजकीय टोलेबाजी दबक्या आवाजात सुरु होती. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिंदे गटातील रायगड जिल्ह्यामधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर दिसून आला.
आमदारांकडून अजित पवारांचा विसर
माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांची जयंती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अलिबागचे आमदार भाषण करण्यास उठले. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित केल्याचे उल्लेख केला. मात्र, त्यांना उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचा नावाचा विसर पडला असल्याचे दिसून आले. त्यांनी संपुर्ण भाषणात अजित पवार यांच्या जयंतीचा साधा उल्लेखही केला नाही.
महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
राज्यासह रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या मित्र पक्षांमध्ये सर्व अलबेल असल्याचे बोलले जाते. मात्र, मागील विधानसभा निवडणूकीपासून जिल्हा परिषद निवडणूकीच्या कालावधीत शिंदे गट विरुद्ध अजित पवार गटात युद्धच सुरु होते. दळवी यांनी अनेक वेळा तटकरेंना भाषणातून अंगावर घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अलिबागमध्ये झालेल्या या शासकीय कार्यक्रमात दळवी आणि तटकरे एकमेकांसोबत साधा एकही शब्द बोलले नाहीत. एकमेकांकडे ते बघतही नसल्याचे उपस्थितांच्या निदर्शनास आले. त्यामुळे महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.
शासकीय कार्यक्रमात भाजपचा झेंडा
महाराजस्व अभियानअंतर्गत वेगवेगळ्या योजनांचा लाभ देण्यासाठी शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी एक व्यक्ती भाजपचा झेंडा हातात घेऊन फिरत होता. शासकीय कार्यक्रमात राजकीय झेंडा फिरत असताना पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. अखेर अलिबाग पोलिसांनी त्या व्यक्तीला बाजूला घेतले. त्याला झेंडा काढून पिशवीत ठेवण्यास सांगितले. मात्र, पोलिसांना चकमा देत त्याने पुन्हा झेंडा बाहेर काढला. इतका बंदोबस्त असतानाही शासकीय कार्यक्रमात राजकीय झेंडा फिरविला जात असताना पोलीस बघ्याच्या भूमिकेत कसे, असा सवाल अनेकांकडून उपस्थित करण्यात आला.दरम्यान, एका पोलीस कर्मचाऱ्याला त्या व्यक्तीने “हात लावू नको”, असे धमकावल्याचा प्रकारही जनतेसमोर दिसून आला.






