प्रशांत नाईक यांच्या हस्ते पहिल्या बाईकची विक्री; वडगाव फाट्याचे नितीन पेडणेकर ठरले पहिले ग्राहक
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग येथे नमिता मोटर्सच्या ट्रायम्फ दुचाकी शोरूमचा शुभारंभ बुधवार, दि. 23 सप्टेंबर रोजी उत्साहात करण्यात आला. प्रीमियम मोटारसायकलींसाठी जगभरात ओळख असलेल्या ट्रायम्फ या ब्रिटिश ब्रँडचे अधिकृत शोरूम अलिबागमध्ये सुरू झाल्याने रायगडमधील दुचाकीप्रेमींसाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. शोरूमचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांच्या हस्ते ट्रायम्फच्या पहिल्या दुचाकीची विक्री करण्यात आली. अलिबाग तालुक्यातील वडगाव फाटा येथील नितीन पेडणेकर यांनी पहिली दुचाकी खरेदी करण्याचा मान मिळवला. प्रशांत नाईक यांच्या हस्ते पेडणेकर यांना दुचाकीची चावी सुपूर्द करण्यात आली.
ट्रायम्फ हा ब्रिटनमधील ऐतिहासिक आणि प्रीमियम मोटरसायकल ब्रँड असून, आकर्षक रचना, दमदार कामगिरी आणि आधुनिक तंत्रज्ञानासाठी तो जगभरात ओळखला जातो. पारंपरिक ब्रिटिश मोटारसायकल वारसा आणि आधुनिक रायडिंग अनुभव यांचा संगम ट्रायम्फच्या विविध मॉडेल्समध्ये पाहायला मिळतो. भारतातील प्रीमियम मोटारसायकल बाजारपेठेतही या ब्रँडने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
नमिता मोटर्सच्या अलिबाग येथील शोरूममध्ये ग्राहकांना ट्रायम्फच्या विविध श्रेणीतील मोटारसायकली उपलब्ध होणार आहेत. यामध्ये स्पीड टी, स्पीड 400, स्क्रॅम्बलर 400 एक्स, स्क्रॅम्बलर 400 एक्ससी, थ्रक्स्टन आणि ट्रॅकर 400 या मॉडेल्सचा समावेश आहे. शोरूममध्ये उपलब्ध मॉडेल्सच्या दर्शविलेल्या एक्स-शोरूम किमतीनुसार, स्पीड टीची किंमत 2 लाख 8 हजार 971 रुपये, स्पीड 400ची 2 लाख 34 हजार 139 रुपये, स्क्रॅम्बलर 400 एक्सची 2 लाख 64 हजार 978 रुपये, तर स्क्रॅम्बलर 400 एक्ससीची किंमत 2 लाख 99 हजार 333 रुपये आहे. थ्रक्स्टनची किंमत 2 लाख 75 हजार 335 रुपये, तर ट्रॅकर 400ची किंमत 2 लाख 41 हजार 882 रुपये आहे.
अलिबागमध्ये ट्रायम्फचे शोरूम सुरू झाल्याने रायगड जिल्ह्यातील ग्राहकांना प्रीमियम मोटारसायकलींची खरेदी आणि संबंधित सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे. अलिबागसह पेण, मुरुड, रोहा आणि परिसरातील मोटारसायकलप्रेमींनाही या शोरूमचा लाभ घेता येणार आहे. शोरूमच्या शुभारंभानिमित्त दुचाकीप्रेमी, ग्राहक, व्यावसायिक आणि नागरिकांनी उपस्थित राहून नमिता मोटर्सच्या या नव्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.






