अग्निशमन दलाची धावपळ
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिका हद्दीसह परिसरात गेल्या 24 तासांत आगीच्या तब्बल 28 घटनांची नोंद झाली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत विविध ठिकाणांहून आगीबाबतचे कॉल प्राप्त झाले. या घटनांमध्ये कचरा, गवत, झाडे तसेच इमारती आणि इतर ठिकाणी आग लागल्याच्या प्रकारांचा समावेश आहे. सुदैवाने या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. या घटनांमध्ये कचरा, गवत, झाडे आणि डोंगराला आग लागण्याच्या प्रकारांचा समावेश आहे.
पनवेलमधील पुष्पकनगर येथे डोंगराला आग लागली. साईनगर येथील साई डेव्हलपर्स, कामठी हाऊस इमारत आणि इतर ठिकाणीही अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. कळंबोली केंद्राच्या हद्दीत रोडपाली सेक्टर 20 येथे कचरा आणि गवताला आग लागण्याच्या घटना घडल्या. कामोठे सेक्टर 36, तळोजा फेज एक, मेट्रो डेपो परिसर, खुटारी गाव आणि नांबचे गाव येथील गोदामाला लागलेल्या आगीचाही अहवालात समावेश आहे. कामोठे परिसरात विविध सोसायट्या आणि कॉम्प्लेक्समध्ये सात वेळा अग्निशमन दलाला धाव घ्यावी लागली. नवीन पनवेलमध्ये दिल्ली विची परिसरात कचऱ्याला, तर शांती कॉलनी सेक्टर पाच येथे झाडाला आग लागली. दरम्यान, साई पॅकिंग येथे तळोजा औद्योगिक क्षेत्राच्या हद्दीबाहेर लागलेल्या आगीची प्रमुख घटना म्हणून स्वतंत्र नोंद करण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या अहवालानुसार, एकूण 28 कॉलपैकी 27 किरकोळ स्वरूपाचे, तर एक प्रमुख स्वरूपाचा होता. 24 तासांत आगीच्या घटनांची ही संख्या लक्षवेधी ठरली आहे. सुदैवाने सर्व घटनांमध्ये जीवितहानी शून्य असल्याने मोठा अनर्थ टळला.
तळोज्यातील साई पॅकिंगला आग
पनवेल अग्निशमन दलाच्या 24 तासांच्या अहवालात तळोजा औद्योगिक क्षेत्राच्या हद्दीबाहेरील साई पॅकिंग येथे लागलेल्या आगीची प्रमुख घटना म्हणून नोंद करण्यात आली आहे. 8 नोव्हेंबर सकाळी 8 ते 9 नोव्हेंबर सकाळी 8 या कालावधीत घडलेल्या एकूण 28 अग्निशमन कॉलपैकी ही एकमेव प्रमुख स्वरूपाची घटना होती. उर्वरित 27 घटना किरकोळ स्वरूपाच्या होत्या. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अहवालात देण्यात आली आहे.





