| पनवेल | प्रतिनिधी |
रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाच्यावतीने विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत पनवेल लोहमार्ग पोलीस ठाण्याच्यावतीने पनवेल रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांसह नागरिकांना सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ‘खाकीतील सखी’, ‘भरोसा कर’, ‘कर तो देखो’ या घोषवाक्याच्या माध्यमातून महिलांमध्ये पोलिसांविषयी विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. रेल्वे प्रवासादरम्यान महिलांना छेडछाड, त्रास किंवा असुरक्षिततेचा सामना करावा लागल्यास त्यांनी घाबरून न जाता तातडीने लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या उपक्रमादरम्यान महिला प्रवाशांना लोहमार्ग पोलिसांच्या डायल 1512 या हेल्पलाइन क्रमांकाची माहिती देण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीत या क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांची मदत घेता येते, याबाबत प्रवाशांमध्ये जनजागृती करण्यात आली.






