| उरण | प्रतिनिधी |
शहरांतून जाणारे सर्वच महामार्ग खड्डेग्रस्त झाले आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू झाली असताना या विमानतळाकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांचीही अवस्था दयनीय आहे. विमानतळाचा प्रवेशमार्ग असलेल्या उलवे-बेलापूर मार्गासह शीव-पनवेल महामार्ग आणि ठाणे-बेलापूर मार्गावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
मुंबई, ठाणे, रायगड, जेएनपीए बंदर, औद्योगिक पट्टा आणि विमानतळाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गांवरील दुरवस्था आता केवळ वाहतुकीचा प्रश्न न राहता सुरक्षिततेचाही गंभीर विषय बनली आहे. नवी मुंबईतील प्रमुख महामार्गांवर दररोज लाखो वाहनांची ये-जा होते. त्यामध्ये विमानतळावर जाणारे प्रवासी, कंटेनर वाहतूक, अवजड मालवाहू वाहने, खासगी बस, सार्वजनिक वाहतूक तसेच दुचाकीस्वारांचा समावेश आहे. मात्र, पावसाळा सुरू होताच या महामार्गांवर मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवास अधिकच धोकादायक बनला आहे. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी अचानक ब्रेक लावणे, वाहनांचे संतुलन बिघडणे आणि किरकोळ अपघातांची मालिका सुरूच आहे. सर्वाधिक गंभीर परिस्थिती शीव-पनवेल महामार्गावर आहे. नवी मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐरोली टोल नाक्यापासून ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंतही खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करून मार्ग काढावा लागत आहे.







