| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
पनवेलकडून पळस्पे फाट्याकडे जाताना चिखले फाट्याजवळ घाणीचे साम्राज्य पसरले आहे. काही व्यक्ती रस्त्याच्या कडेला कोंबड्यांची घाण, पिसे आणून टाकत असल्याने या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस मंडळ सदस्य वसंत काशिनाथ फडके यांनी यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायतीकडे डम्पिंग ग्राउंड नसल्याने कुठेही आणि कसाही प्रकारे कचरा सर्वत्र फेकला जातो. त्यातच पनवेल तालुक्यात लोकवस्ती वाढल्याने मटन, चिकनची दुकाने वाढले आहेत. हाच कचरा काही ठिकाणी नदीमध्ये फेकला जात आहे तर बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला फेकला जातो. चिखले फाट्याजवळ देखील कोंबड्यांची घाण रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात टाकली जात आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. या दुर्गंधीमुळे येणा जाणाऱ्या वाहन चालकांना याचा त्रास होतो. याच ठिकाणाहून शाळेतील विद्यार्थी देखील जातात. त्यामुळे त्या दुर्गंधीमुळे रोगराई पसरण्याची देखील भीती व्यक्त केली जाते. यासंदर्भात ग्रामपंचायत आणि प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्याची मागणी वसंत फडके यांनी केली आहे.







