गोकुळ, स्मार्ट मीटर आणि टोरेंटविरोधात आंदोलनाचा निर्धार
| मुंबई | प्रतिनिधी |
शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा, सर्वसामान्यांच्या खिशावर वीजबिलांचा भार आणि सह्याद्रीच्या पर्यावरणाची हानी करणारे प्रकल्प, अशा विविध मुद्द्यांवर शेतकरी कामगार पक्षाने सरकारला थेट आव्हान दिले आहे. अन्यायाविरुद्ध शेतकरी कामगार पक्ष रस्त्यावर उतरून संघर्ष करेल, असा ठाम इशारा पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी दिला. गोकुळ दूध संघातील अशासकीय सदस्य नियुक्ती, जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविणे आणि टोरेंट प्रकल्पाच्या मुद्द्यांवर त्यांनी सरकारला धारेवर धरले. दरम्यान, दुष्काळग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी शेकाप क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून निधी उभारणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईत गुरुवारी दि. 5 पत्रकारांशी बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवरही जोरदार हल्लाबोल केला. यावेळी शेकापचे मुंबई कार्यालयीन चिटणीस ॲड. राजेंद्र कोरडे, पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या प्रमुख ॲड. साम्या कोरडे आदी उपस्थित होते.
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये शेकापचे कार्यकर्ते व पदाधिकारी आजही सक्रिय आहेत. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघातही शेकापचे पदाधिकारी संचालक म्हणून निवडून आले आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींचा अधिकार डावलून सरकार शासकीय व तज्ज्ञ स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याच्या तयारीत आहे. हा शेतकऱ्यांच्या लोकशाही अधिकारांवर घाला असल्याचे सांगत, या निर्णयाविरोधात शेकाप रस्त्यावर उतरून लढा देईल, असा इशारा चित्रलेखा पाटील यांनी दिला.
दुसरीकडे, वाढत्या वीज बिलांमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले असताना, अदानी पॉवरचे कर्मचारी जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवत असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकारावर सरकारने मौन बाळगल्याची टीका करत, जनतेवर लादले जाणारे स्मार्ट मीटर शेकाप खपवून घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. टोरेंट कंपनीच्या प्रकल्पावरूनही त्यांनी सरकारला लक्ष्य केले. सह्याद्रीच्या डोंगरकपारी आणि पर्यावरणाला धोका निर्माण करणाऱ्या प्रकल्पाला अवघ्या 20 दिवसांत परवानग्या देण्यात आल्या. हजारो झाडांची कत्तल सुरू असल्याचा आरोप करत, विकासाच्या नावाखाली निसर्गाचा बळी दिला जात असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी शेकापच्या महिला पदाधिकारी साम्या कोरडे यांनी पोलिसांच्या माध्यमातून आंदोलकांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप केला. आंदोलकांना पीस बाँडवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले जात आहे. मात्र, अशा दबावाला आम्ही झुकणार नाही आणि पीस बाँडवर स्वाक्षरी करणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. सध्याची परिस्थिती आणीबाणीसारखी असल्याची टीकाही त्यांनी केली.
दुष्काळग्रस्तांसाठी निधी उभारणार
दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकरी आणि नागरिकांना मदत करण्यासाठी शेकाप पुढाकार घेणार आहे. त्यासाठी क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून लोकसहभागातून निधी उभारण्यात येणार असल्याचे चित्रलेखा पाटील यांनी स्पष्ट केले.







