खरीप पीक स्पर्धेतून कर्जतच्या शेतकऱ्यांना जिल्हा, राज्यस्तरावर झळकण्याची संधी
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील भात आणि नाचणी उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. खरीप हंगाम 2026 अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या पीक स्पर्धेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, शेतकऱ्यांनी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. उत्कृष्ट उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना तालुका, जिल्हा तसेच राज्यस्तरावर गौरविण्याची संधी या स्पर्धेतून मिळणार आहे.
शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पीक उत्पादकता वाढवावी, प्रगतिशील शेतकऱ्यांच्या प्रयोगांचा इतरांना लाभ मिळावा आणि उत्कृष्ट उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव व्हावा, या उद्देशाने कृषी विभागामार्फत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे ही स्पर्धा केवळ पारितोषिकाची संधी नसून शेतकऱ्यांच्या शेतीतील कौशल्य, नियोजन आणि प्रयोगशीलता सिद्ध करण्याचे व्यासपीठ ठरणार आहे.
कर्जत तालुका भात उत्पादनासाठी महत्त्वाचा असून, येथील शेतकरी आधुनिक पद्धतींचा वापर करून भात उत्पादन घेत आहेत. त्याचबरोबर नाचणी हेही कोकणातील महत्त्वाचे पीक आहे. त्यामुळे या दोन्ही पिकांच्या उत्पादकांनी मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या संकेतस्थळावरील ‘पीक स्पर्धा नोंदणी’ सुविधेद्वारे ऑनलाइन अर्ज करावा. कर्जत तालुक्यातील पात्र भात व नाचणी उत्पादकांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या उत्कृष्ट उत्पादनाची ओळख जिल्हा आणि राज्यस्तरावर निर्माण करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
भातासाठी 20, तर नाचणीसाठी 40 गुंठे क्षेत्र आवश्यक
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्याने संबंधित पीक स्वतःच्या नावावर असलेल्या जमिनीवर स्वतः लागवड केलेले असणे आवश्यक आहे. भात पिकासाठी किमान 20 गुंठे, तर नाचणीसाठी किमान 40 गुंठे सलग लागवड क्षेत्र असणे आवश्यक आहे. सुधारित वाणांचा वापर, योग्य खत व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण, पाणी व्यवस्थापन, तण नियंत्रण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढविणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही विशेष संधी आहे.
तालुका ते राज्यस्तरावर गौरवाची संधी
पीक स्पर्धेत सहभागी झाल्याने उत्कृष्ट उत्पादनाची नोंद होण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे. उत्कृष्ट शेतकऱ्यांच्या शेतीतील प्रयोगांचा इतर शेतकऱ्यांना फायदा होईल. तसेच तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर गौरव व रोख पारितोषिक मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे.







