पद्यदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाची मागणी
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड येथील तवसाळकर लॉजसमोरील मोरीचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाने दिला आहे. याबाबत मंडळाचे अध्यक्ष अरविंद गायकर यांनी मुरूड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांच्या वतीने कनिष्ठ लिपिक दर्शन मिठाग्री यांच्याकडे निवेदन सादर केले. यावेळी उपाध्यक्ष देवेन सतविडकर उपस्थित होते.
मुरूड हे पर्यटनस्थळ असल्याने मुरूड समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या संख्येने पर्यटक येतात. तसेच समुद्रकिनाऱ्यावरून जंजिरा किल्ल्याकडे जाणारा हा प्रमुख मार्ग आहे. मात्र, गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून मोरीचे काम रखडल्याने या मार्गावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे वाहनचालक, व्यावसायिक आणि नागरिकांमध्ये वादाचे प्रसंगही घडत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
येत्या काळात सार्वजनिक गोविंदा, गौरी-गणपती व नवरात्रोत्सव असल्याने या मार्गावर मोठी गर्दी होणार आहे. मोरीचे काम अपूर्ण राहिल्यास अपघात होऊन जीवितहानी अथवा दुखापत झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असा इशाराही मंडळाने दिला आहे. 15 ऑगस्ट 2026 पूर्वी मोरीचे काम पूर्ण न झाल्यास मंडळाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.






