| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन शहराला रानवली येथील पाझर तलवामधून पाणीपुरवठा करण्यात येतो. दोन वर्षांपूर्वी या पाझर तलावाजवळ नव्याने जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला असून, जलशुद्धीकरण प्रकल्पापासून ते साठवण टाकीपर्यंत जलवाहिन्या देखील नव्याने टाकण्यात आल्या आहेत. परंतु, हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे जलवाहिन्या वारंवार फुटत आहेत. रानवली ते साठवण टाकी यामधील जलवाहिन्या वारंवार फुटत असल्यामुळे पाझर तलावातील पाण्याची पातळी कमी होते. यावर्षी मे महिन्याच्या पंधरा तारखेनंतरच श्रीवर्धन शहरात पाणीटंचाई सुरू झाली. जलवाहिन्या वारंवार फुटत असल्यामुळे पाण्याची गळती होऊन लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्याचबरोबर श्रीवर्धन शहरात ज्या नागरिकांच्या घरांमध्ये नळ जोडणी दिलेली आहे त्या नळ जोडणीच्या ठिकाणी देखील अनेक वेळा पाईप लीक झालेले आढळुन येतात. त्यामुळे देखील खूप मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते. या जलशुद्धीकरण प्रकल्प व जलवाहिन्या बदलण्याचे काम कोल्हापूर येथील रविराज इन्फ्रास्ट्रक्चर्स या कंपनीने केले आहे. ठेकेदार काम करून बिल घेऊन निघून देखील गेला आहे. मात्र, मनस्ताप श्रीवर्धनच्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण देखील अत्यल्प आहे. रानवली पाझर तलाव अद्याप पर्यंत पूर्ण भरलेला नाही. त्यातच जलवाहिन्या पाच ते सहा ठिकाणी छोट्या स्वरूपात फुटलेल्या असल्यामुळे पाणी वाया जात आहे.






