| पनवेल | प्रतिनिधी |
वाशी सेक्टर-11 येथील अष्टविनायक सोसायटीमध्ये रविवारी (दि.9 ) सायंकाळी खळबळजनक हत्या घडल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, 42 वर्षीय मुलाने आपल्या 65 वर्षीय आईची गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी वाशी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव नंदा कदम (65) असून, आरोपीचे नाव महेश कदम (42) आहे. दोघेही वाशी सेक्टर-11 येथील अष्टविनायक सोसायटीमध्ये राहात होते. प्राथमिक तपासात आरोपी आपल्या आईच्या वागणुकीवरून नाराज असल्याचे समोर आले आहे. आरोपीचा आरोप होता की, त्याची आई त्याच्या पत्नीला पुरेसे महत्त्व देत नव्हती तसेच मुलीची बाजू घेत होती. याच कारणावरून आरोपीच्या मनात आईविषयी नाराजी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
9 ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे 6 ते रात्री 9.50 वाजण्याच्या दरम्यान घरात वाद झाला. या वादातून संतापलेल्या आरोपीने आईचा गळा आवळल्याचा आरोप आहे. तसेच तिचे डोके फरशीवर आपटल्याचीही माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली असून, हत्येमागील नेमके कारण आणि संपूर्ण घटनाक्रमाचा तपास सुरू आहे.







