डिसेंबरअखेर काम पूर्ण करण्याचे लक्ष्य; बोगद्यांतील विद्युतकरण, यांत्रिककरण सुरू
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय रेल्वेमार्गाचे 99 टक्के काम पूर्ण झाले आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून (एमआरव्हीसी) मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत (एमयूटीपी-3) हा मार्ग उभारण्यात येत आहे. 29.6 किलोमीटर लांबीच्या या दुहेरी रेल्वेमार्गासाठी 2,782 कोटी रुपयांचा खर्च मंजूर आहे. डिसेंबर 2026 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
एमआरव्हीसीच्या माहितीनुसार, सप्टेंबरअखेर प्रकल्पाचे 99 टक्के काम पूर्ण झाले आहे. मार्गावरील बहुतांश मोठी बांधकामे पूर्ण झाली आहेत. नऊ मोठे पूल, 35 छोटे पूल, पाच रस्ते उड्डाणपूल आणि 16 रस्ते भुयारी मार्गाची कामे पूर्ण झाली आहेत. पनवेल आणि कर्जत येथील दोन रेल्वे उड्डाणपुलांचे कामही पूर्ण झाले आहे. या मार्गावरील तिन्ही बोगद्यांची कामे पूर्ण झाली आहेत. बोगद्यांतील विद्युत आणि यांत्रिक कामे सध्या सुरू आहेत. एकूण 69.70 किलोमीटरपैकी 68.70 किलोमीटर लांबीच्या रेल्वे रुळांची जोडणी पूर्ण झाली आहे. पुणे द्रुतगती मार्गाखालील भुयारी मार्गातूनही रेल्वे रुळांची जोडणी करण्यात आली आहे. पनवेल, चौक आणि मोहापे येथील रेल्वे रुळांशी संबंधित महत्त्वाची कामेही पूर्ण झाली आहेत. नवीन पनवेल स्थानकाची इमारत वापरात आली आहे. चिखले आणि मोहापे स्थानकांच्या इमारतींची कामे पूर्ण झाली आहेत. चौक स्थानकाची इमारत आणि भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले असून, फलाटावरील निवारा आणि स्थानक परिसरातील अन्य कामे सुरू आहेत. कर्जत स्थानकावरील फलाट, स्थानकाची इमारत, लिफ्ट, जिने, सरकते जिने आणि इतर प्रवासी सुविधांची कामे अंतिम टप्प्यात आहेत.
इंटरलॉकिंग यंत्रणेच्या चाचण्यासिग्नल यंत्रणेचे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. मोहापे आणि चौक स्थानकांवरील इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणेच्या चाचण्याही पूर्ण झाल्या आहेत. दूरसंचाराशी संबंधित उर्वरित कामे सुरू आहेत. प्रकल्पासाठी आवश्यक खासगी आणि सरकारी जमिनींचे संपादन पूर्ण झाले असून, आवश्यक वनविषयक मंजुऱ्याही मिळाल्या आहेत.
आर्थिक विकासाला चालना मिळेल
पर्यायी रेल्वेमार्ग नवा मार्ग सुरू झाल्यानंतर पनवेल ते कर्जत प्रवासासाठी आणखी एक उपनगरीय रेल्वेमार्ग उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नवी मुंबई, कर्जत आणि रायगड परिसरातील रेल्वे प्रवास अधिक सोयीचा होण्याची अपेक्षा आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेवरील वाहतुकीचे नियोजनही अधिक सुलभ होणार आहे. तसेच या मार्गामुळे परिसरातील निवासी आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा दावा एमआरव्हीसीने केला आहे.






