| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील हुतात्मा भाई कोतवाल आणि हिरवी पाटील यांचे स्मारक कर्जत पंचायत समिती कार्यलयात आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि दोन्ही हुतात्म्यांच्या मूर्ती असलेले हे दालने गळके आणि मळके बनले होते. याबाबत आवाज उठवल्यावर पोलीस मित्र संघटनेने दि.15 ऑगस्टची डेडलाईन देत हुतात्मांचे दालन सुशोभित करण्याची मागणी केली होती. तर, कर्जत पंचायत समितीचे माजी सभापतती अमर मिसाळ यांनी दोन दिवसांत सुशोभीकरणाच्या कामे सुरु झाली नाहीत तर आपण स्वखर्चाने सुशोभीकरण करणार, असा इशारा दिला होता. त्यानंतर गटविकास अधिकारी यांच्या देखरेखीत दालनाच्या सुशोभीकरणाच्या कामाची सुरुवात झाली आहे. दरम्यान, कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी हुतात्मा दालनाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. हुतात्म्यांच्या स्मृती जपण्यासाठी आणि त्यांच्या त्यागाची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हे दालन उभारण्यात आले होते. यावेळी सुरू असलेल्या कामाची पाहणी करताना त्यांनी दालनाचे काम नियोजनानुसार आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. हुतात्म्यांच्या स्मृतींना उजाळा देणारे हे दालन कर्जतच्या सामाजिक व ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी महत्त्वाची भर पडणार आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.







