शासकीय कार्यक्रमांसाठी नवी नियमावली; राष्ट्रीय गीताला विशेष सन्मान देण्याची तरतूद
| नवी दिल्ली | प्रतिनिधी |
शासकीय कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीत ‘जन गण मन’ आणि राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ दोन्ही गायले जाणार असल्यास ‘वंदे मातरम्’ प्रथम गायले जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी ‘राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान निवारण (सुधारणा) विधेयक 2026’ला मंजुरी दिली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे आता राष्ट्रीय गीत असलेल्या ‘वंदे मातरम’ला राष्ट्रगीत ‘जन गण मन’प्रमाणेच समान कायदेशीर संरक्षण प्राप्त झाले आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय गीताच्या गायनासंदर्भात नियमावली निश्चित केली असून, त्यात कार्यक्रमातील प्राधान्यक्रम स्पष्ट करण्यात आला आहे. यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनी पहिल्यांदाच लाल किल्ल्यावरून वंदे मातरम्चे गायन केले जाणार आहे. अधिकृत कार्यक्रमांमध्ये वंदे मातरम्ची सर्व सहा कडवी गायली जातील. यासाठी 3 मिनिटे 10 सेकंदांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
कोणत्याही शासकीय कार्यक्रमात राष्ट्रगीत (जन-गण-मन) आणि राष्ट्रीय गीत एकत्र वाजवले किंवा गायले जाणार असल्यास, वंदे मातरम् प्रथम गायले जाईल.
‘वंदे मातरम्’ला ‘जन गण मन’प्रमाणेच सन्मान आणि कायदेशीर संरक्षण देण्याच्या दिशेने केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. राष्ट्रीय गीत सुरू असताना उपस्थितांनी सावधान स्थितीत उभे राहण्याचे निर्देशही नियमावलीत करण्यात आले आहेत.
नवीन कायद्यानुसार, वंदे मातरम्चे गायन रोखणे किंवा गायन चालू असताना त्यात अडथळा निर्माण करणे हा गंभीर गुन्हा मानला जाईल. असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला तीन वर्षांपर्यंतचा कारावास, दंड, किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. जर एखाद्या व्यक्तीने हा गुन्हा पुन्हा केला, तर त्याला किमान एक वर्षाच्या कारावासाची तरतूद करण्यात आली आहे.







