| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकातील फलाट दोनवर मुंबईच्या दिशेकडे सरकता जिना उभारण्याचे काम सुरु आहे. या सरकत्या जिन्याचे काम गेल्या दोन महिन्यांपासून बंद स्थितीत आहे. प्रवासी वर्गाची गैरसोय लक्षात घेऊन मुंबई रेल कॉर्पोरेशनकडून सरकता जिना उभारण्याचे काम जोमाने करावे, अशी मागणी स्थानकातून दररोज प्रवास करणारे प्रवाशी संतोष पेडामकर यांनी केली आहे.
नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकात फलाट दोनवर नवीन सरकता जिना बनविला जात आहे. त्या ठिकाणी पूर्वी अस्तित्त्वात असलेला पादचारी पूल मध्य रेल्वेकडून तोडून टाकण्यात आला आहे. त्यानंतर त्या ठिकाणी सरकता जिना बनविला जाणार आहे. हा पादचारी पूल तोडण्यात आल्यानंतर साधारण वर्षभर त्या ठिकाणी कोणतेही काम करण्यात आले नाही. त्यामुळे तेथे नवीन पूल बनविला जाणार नव्हता तर जुना पादचारी पूल का तोडण्यात आला? असा प्रश्न सर्वसामान्य प्रवासी विचारत आहेत. मात्र, मध्य रेल्वे प्रशासनाकडून त्यावर कोणतेही उत्तर दिले गेले नाही. आता नवीन सरकता जिना बनवण्याचे काम मुंबई रेल कोर्पोरेशन कडून सुरु करण्यात आले आहे. मात्र, त्या ठिकाणी खड्डा खोदून ठेवला असून, त्यापुढे कोणतेही काम रेल्वे कडून करण्यात आलेले नाही.







