अधिसूचित आजार म्हणून झाली वर्गवारी; जिल्ह्यापर्यंत नोडल यंत्रणा उभारणार
| रायगड | प्रतिनिधी |
राज्यातील सर्पदंशामुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने सर्पदंशाचा अधिसूचित आजार म्हणून समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील सरकारी तसेच खासगी रुग्णालयांना सर्पदंशाच्या प्रत्येक संशयित, संभाव्य किंवा निश्चित घटनेची तसेच त्यातून झालेल्या मृत्यूची नोंद करणे बंधनकारक होणार आहे.
सर्पदंशाच्या घटनांची अचूक आकडेवारी उपलब्ध झाल्याने उपचार व्यवस्था, सर्पविष प्रतिबंधक लस (एएसव्ही) आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. सर्पदंशामुळे होणारी विषबाधा ही संभाव्य जीवघेणी स्थिती आहे. अशा वेळी वेळेत निदान, योग्य प्रथमोपचार, रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करणे आणि गरजेनुसार एएसव्ही उपलब्ध करून देणे महत्त्वाचे ठरते. मात्र, सर्पदंशाच्या अनेक घटनांची आरोग्य यंत्रणेकडे नोंद होत नसल्याने त्याबाबतची अचूक माहिती उपलब्ध होण्यात अडचणी येतात. ही बाब लक्षात घेऊन सर्पदंशाच्या घटनांची शास्त्रशुद्ध नोंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्पदंश प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राज्यस्तरावर संचालक (रुग्णालये) यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यावर ही जबाबदारी राहणार आहे. महापालिका क्षेत्रात वैद्यकीय अधिकारी तसेच अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील. सर्पदंशाची प्रत्येक संशयित, संभाव्य किंवा निश्चित घटना संबंधित जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा जिल्हा शल्यचिकित्सकांना कळवावी लागणार आहे. सर्पदंशामुळे मृत्यू झाल्यास त्याची माहिती उपलब्ध संवाद यंत्रणेद्वारे तत्काळ देणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही माहिती आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली (एचएमआयएस), एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम (आयडीएसपी) किंवा शासनाने निश्चित केलेल्या अन्य अहवाल प्रणालीमध्ये नोंदवली जाणार आहे.
उपचारापासून मृत्यूपर्यंत नोंद
सर्पदंश झालेल्या रुग्णाच्या नोंदीमध्ये दंशाची तारीख आणि ठिकाण, रुग्णाचे वय व लिंग, सर्पदंशाची परिस्थिती, विषबाधेची लक्षणे, करण्यात आलेले उपचार आणि देण्यात आलेल्या एएसव्हीच्या कुप्यांची संख्या यांचा समावेश करावा लागणार आहे. रुग्णाला अन्य रुग्णालयात संदर्भित केले असल्यास त्याचा तपशील, उपचाराचा परिणाम आणि मृत्यू झाल्यास त्याची स्वतंत्र नोंद ठेवणेही बंधनकारक असेल. या माहितीच्या आधारे सर्पदंशाचे प्रमाण, त्याचे भौगोलिक स्वरूप, उपचारांची गरज आणि एएसव्हीच्या उपलब्धतेचे नियोजन करणे आरोग्य विभागाला शक्य होणार आहे. त्यामुळे सर्पदंशाच्या घटना केवळ उपचारापुरत्या न राहता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठीही या नोंदींचा उपयोग होणार आहे.







