व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांवर अन्याय; जुन्या जागा परत देण्याची मागणी
| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती ही सर्वसामान्य व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बाजारपेठ मानली जाते. मात्र, बाजार समितीचे नवनियुक्त सचिव पुरुषोत्तम पाटील हे व्यापारी, शेतकरी तसेच कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक अटी लादून मनमानी कारभार करत असल्याचा गंभीर आरोप व्यापारी व शेतकऱ्यांनी केला आहे. या कारभाराला कंटाळून व्यापारी आणि शेतकरी एकत्र येत आपली भूमिका मांडली.
बाजार समितीच्या आवारात नव्याने सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. या काँक्रीटच्या जागेवर 6 बाय 4 फुटांचे चौकोन आखून त्याच मर्यादित जागेत व्यापार करण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. एवढ्या छोट्या जागेत एक हातगाडी उभी केल्यानंतर दोन व्यक्तींनाही व्यवस्थित उभे राहता येत नाही, मग व्यापाऱ्यांनी माल ठेवायचा कुठे आणि ग्राहकांनी खरेदी करायची कशी, असा सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
व्यापाऱ्यांची स्पष्ट मागणी आहे की, ज्या जुन्या जागांवर ते अनेक वर्षांपासून व्यवसाय करत आहेत, त्याच जागा त्यांना पुन्हा उपलब्ध करून द्याव्यात. आजवर व्यापारी एकमेकांशी समन्वयाने आणि गुण्यागोविंदाने व्यवसाय करत आले आहेत. बाजार समितीच्या अडचणी समजून घेत त्यांनी अनेक वर्षे परिस्थितीशी जुळवून घेत व्यवसाय केला. मात्र, आता अचानक कठोर नियम लादून व्यापाऱ्यांना अडचणीत आणू नये, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
पावसाळ्यात बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी आणि चिखल होत असतानाही व्यापारी व शेतकरी अनेक वर्षे त्याच परिस्थितीत व्यवसाय करत आहेत. त्यावेळी त्यांनी सभापती किंवा संचालक मंडळाकडे कोणत्याही तक्रारी न करता परिस्थितीशी जुळवून घेत व्यवसाय सुरू ठेवला. मात्र, सध्याच्या कारभाराबाबत व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढल्याचे चित्र आहे. सचिवांकडून व्यापारी, शेतकरी तसेच बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना योग्य वागणूक मिळत नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. अनेक निर्णय घेताना संचालक मंडळाला विश्वासात घेतले जाते का, याबाबतही व्यापारी व शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात संचालक मंडळाने हस्तक्षेप करून वस्तुस्थिती जाणून घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, बाजार समितीच्या आवारात लावण्यात आलेल्या रिफ्लेक्टरच्या स्क्रूंबाबतही व्यापारी व शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. हे स्क्रू पायाला लागून अनेकांना दुखापत झाल्याचा आरोप करण्यात आला असून, सुरक्षेच्या दृष्टीने त्याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, व्यापारी आणि शेतकऱ्यांचा रोष संचालक मंडळापेक्षा सचिवांच्या कार्यपद्धतीविरोधात अधिक असल्याचे यावेळी दिसून आले. त्यामुळे संचालक मंडळाने केवळ नियमांची अंमलबजावणी करण्यापेक्षा प्रत्यक्ष व्यापारी आणि शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यावर सकारात्मक तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
बाजार समिती ही व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी असताना त्यांनाच अडचणीत आणणारे निर्णय घेतले जाऊ नयेत. त्यामुळे सचिव, सभापती आणि संचालक मंडळाने व्यापारी व शेतकऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या मागण्यांवर चर्चा करावी आणि सर्वमान्य तोडगा काढावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. त्यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या या नाराजीवर बाजार समिती प्रशासन काय भूमिका घेते आणि त्यांच्या मागण्यांवर कोणता तोडगा काढला जातो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






