पनवेल तालुका पोलिसांची मोठी कामगिरी
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील वावंजे येथील एस.एस. इंजिनिअरिंग कंपनीच्या गोदामातून 4 लाख 50 हजार रुपये किमतीचे 180 मशिन पार्ट्स चोरी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेली दोन वाहने असा एकूण 12 लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि.14 ते 17 ऑगस्टदरम्यान वावंजे येथील एस.एस. इंजिनिअरिंग कंपनीच्या गोदामात ठेवण्यात आलेले 180 मशिन पार्ट्स चोरीला गेल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तांत्रिक तपास तसेच गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून मोहम्मद आलीम अली हसन मन्सुरी (45), मोहम्मद इर्शाद अली हसन मन्सुरी (33) आणि कैस अनवर पटेल (32) यांना अटक केली. अधिम तपासात चोरीचे 4 लाख 50 हजार रुपये किमतीचे 180 मशिन पार्ट्स जप्त करण्यात आले. तसेच, गुन्ह्यात वापरलेली 80 हजार रुपये किमतीची ऑटोरिक्षा आणि 4 लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप पोलिसांनी ताब्यात घेतली. तसेच, आणखी काही चोरीचे गुन्हे देखील उघडकीस आले आहेत. त्यामध्ये 465 स्टेनलेस स्टील क्यूआरसी मेल पार्ट्स, केबलमधील तांब्याच्या तारा इत्यादी मुद्देमालाचा समावेश असून, विविध गुन्ह्यांतील एकूण 7 लाख 22 हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. असा एकूण 12 लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.






