| माणगाव | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावरील कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या माणगाव काळनदी व कळमजे येथील नव्या पुलांवर अवघ्या काही काळातच खड्डे, आणि खचलेल्या भरावाची समस्या निर्माण झाली आहे. महामार्ग प्रशासनाकडून सध्या या खड्ड्यांना बुजवण्यासाठी ग्रिट माती टाकून ठिगळ लावले जात आहे. त्यामुळे नवीन पुलांच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
माणगाव तालुक्यासह दक्षिण रायगडच्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या माणगाव काळनदी पूल, कळमजे पूल आणि कशेडी-चोराडी पूल या तीन नवीन पुलांच्या बांधकामासाठी शासनाकडून तब्बल 23 कोटी 36 लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली होती. जानेवारी 2019 मध्ये या कामांना मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित ठेकेदाराला 24 फेब्रुवारी 2022 रोजी कामाची वर्क ऑर्डर देण्यात आली. करारानुसार ही कामे 14 ऑगस्ट 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, निर्धारित वेळेत कामे पूर्ण न झाल्याने ठेकेदाराला दंडासह पुन्हा मुदत वाढ देण्यात आली आणि अंतिम मुदत जून 2026 पर्यंत वाढविण्यात आली. या तीनही पुलांची कामे एकाच ठेकेदाराकडे सोपविण्यात आली होती. त्यापैकी कशेडी येथील चोराडी पूल 35 मीटर, माणगाव काळनदी वरील पूल 105 मीटर, तर कळमजे नदीवरील पूल 35 मीटर लांबीचा आहे. वेळेत काम पूर्ण न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी असतानाच पावसाळ्या पूर्वी घाईगडबडीत माणगाव काळ नदी आणि कळमजे येथील पुलांची कामे पूर्ण करण्यात आली. मात्र, काम पूर्ण होऊन काही काळ लोटत नाही तोच या नव्या पुलांच्या बांधकामाच्या गुणवत्ते बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नवीन पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, काही ठिकाणी काँक्रीटला भेगा पडल्याचेही निदर्शनास आले आहे. सध्या पुन्हा पुलावर खड्डे पडल्याने ते ग्रिट आणि माती टाकून बुजविण्याचे काम सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या नव्या पुलावर काही महिन्यांतच ग्रिट-मातीची ठिगळे लावण्याची वेळ का आली, असा सवाल प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.






