। पनवेल । प्रतिनिधी ।
सोन्याच्या शुद्धतेची तपासणी करण्यासाठी मालकाने दिलेल्या सहा सोन्याच्या लगडी घेऊन नोकर फरार झाल्याची घटना पनवेलमध्ये उघडकीस आली आहे. या सोन्याचे वजन 666.23 ग्रॅम असून, त्याची एकूण किंमत 66 लाख 62 हजार 300 रुपये आहे. या प्रकरणी एका तरुणाविरोधात पनवेल शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील तक्रारदार रोशन कोळेकर (24) यांचा झवेरी बाजारात सोन्याचे दागिने शुद्ध करण्याचा व्यवसाय आहे. सदर तरुण हा गेल्या आठ महिन्यांपासून त्यांच्या दुकानात काम करीत होता. कोळेकर यांनी सोन्याच्या शुद्धतेची तपासणी करून आणण्यासाठी शुभमकडे सहा सोन्याच्या लगडी दिल्या. या लगडी घेऊन तो जोशी आळी येथील मिडास हॉलमार्क सेंटरकडे गेला. मात्र, बराच वेळ उलटूनही तो दुकानात परतला नाही. संशय आल्याने कोळेकर यांनी त्याच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा मोबाइल बंद असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याचा परिसरात शोध घेण्यात आला; परंतु शुभमचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर कोळेकर यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.







