। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातून जाणाऱ्या कर्जत- मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (दि.24) सकाळी भीषण अपघात घडला. या अपघातात आर्या ठोंबरे या शालेय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
कर्जत- मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर कर्जत तालुक्यातील कुंडलज येथील एका विद्यार्थिनीला इको गाडीने उडवले. या अपघातात आर्या ठोंबरे या शालेय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इयत्ता 5 वी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी आर्या अनिल ठोंबरे ही शाळेतून घरी येत असताना रस्त्यावरून भरधाव वेगाने धावणाऱ्या इको चालकाकडून नियंत्रण सुटल्याने अपघात घडला. अपघातानंतर तेथील स्थानिकांनी तिला कर्जत उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असता आर्या या विद्यार्थिनीला डॉक्टरांनी मृत घोषित केले. भालिवडी येथील इको गाडी चालक अल्पेश कर्णूक यांनी भरधाव वेगाने शाळेतून घरी जाणाऱ्या विद्यार्थिनीला धडक दिल्याने खूप मोठा अपघात झाला. या अपघाताने कुंडलज गावावर शोककला पसरली आहे.






