पाचही आरोपी अटकेत; दहा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा
| नेरळ | प्रतिनिधी |
जमिनीच्या वादातून देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळी झाडून 65 वर्षीय व्यक्तीच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या प्रकरणातील तब्बल दहा महिन्यांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपीच्या रायगड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. कर्जत पोलिसांच्या तपास पथकाने पुण्यातील कोंढवा येथे एका मित्राच्या घरात लपून बसलेल्या जतीन संतोष पवार (24) रा. जांभुळवाडी, पुणे याला 19 ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूलही जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे गुन्ह्यातील पाचही आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आले आहेत.
कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोटलवाडी, पो. गौळवाडी येथे 1 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली होती. तक्रारदार इस्माईल सैय्यद मालदार (65) हे घरासमोरील मोकळ्या जागेत मुफीज गुलाम मालदार याच्याशी जागेच्या वादातून चर्चा करीत असताना, त्याच्यासोबत आलेल्या जतीन पवार याने देशी बनावटीचे पिस्तूल तक्रारदाराच्या दिशेने रोखून एक गोळी झाडली. त्यानंतर आरोपी पसार झाले. घटनेनंतर कर्जत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आतापर्यंत चार आरोपींना अटक केली होती. मात्र, गोळीबार करणारा मुख्य आरोपी जतीन पवार हा पोलिसांना तब्बल दहा महिने गुंगारा देत होता. तो वारंवार ठिकाणे बदलत असल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान ठरले होते.
फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी गोपनीय बातमीदारांचे जाळे सक्रिय केले होते. त्यापैकी एका बातमीदाराकडून आरोपी कोंढवा-पुणे येथे मित्राच्या घरी लपून बसल्याची अचूक माहिती मिळाली. त्यानुसार कर्जत पोलिसांच्या तपास पथकाने 19 ऑगस्ट रोजी कोंढवा येथे छापा टाकून जतीन पवारला ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्याने गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल पंचनाम्याद्वारे जप्त करण्यात आले.
जतीन पवार हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध पुण्यातील शिवाजीनगर, बिबवेवाडी आणि फुरसुंगी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत भारतीय शस्त्र अधिनियम व एनडीपीएस कायद्यांतर्गत एकूण पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक आचल दलाल, पोलीस अधीक्षक अभिजीत शिवतरे आणि कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक मनीषा लटपटे, पोलीस हवालदार केशव नागरगोजे, स्वप्निल येरूनकर, समीर भोईर, विठ्ठल घावस आणि बबन घुले यांच्या तपास पथकाने ही कारवाई केली. दहा महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या आरोपीला अखेर जेरबंद करण्यात कर्जत पोलिसांना यश आल्याने या कामगिरीचे कौतुक होत आहे.






